नाशिक: दैवी शक्ती आणि करणी काढण्याच्या बहाण्याने भोंदू अशोक खरात अन् महेशगिरी महाराज' (महेश काकडे) यांंनी भक्तांना गंडविल्याचे प्रकरण नाशिकमध्ये ताजे असतानाच पुन्हा एक असेच प्रकरण सोमवारी सायंकाळी उघड झाले. अघोरी पूजा, भूत-प्रेत बाधा आणि शापित जमिनीचे भय दाखवून दोन सख्ख्या भावांची मानसिक फसवणूक करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून सहा एकर शेती हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.<br>याप्रकरणी संशयित कमलेश उर्फ शिवकुमार अधिकारी, त्यांची पत्नी गौरी अधिकारी आणि इतर साथीदारांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मदन नवनाथ देवकर (२६, रा. लऊळ, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचा भाऊ ज्ञानेधर हे आई-वडिलांच्या निधनानंतर सहा एकर शेती कसून उदरनिर्वाह करत होते. सप्टेंबर २०२३ मध्ये युट्युबवरील ‘नाथ भक्ती व त्रिकाल रहस्य’ या चॅनलद्वारे त्यांचा कमलेश अधिकारी यांच्याशी परिचय झाला. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे मानसिक तणावात असलेल्या दोन्ही भावांना आरोपींनी ‘तुमच्या जमिनीवर मृत आत्म्यांचा वावर असून अघोरी पूजा करावी लागेल, असे सांगून अंधश्रद्धेला खतपाणी घालून दोघा भावांची लुट करण्यात आली. कुटुंबाचे मागच्या जन्मीचे पाप आहे व ते राहत असलेल्या जमिनीत असलेला दैवी दोष आहे. त्या जमिनीत असलेला गुप्तधनाचा साठा व त्याच्यावर असलेले अतृप्त आत्मे यांनीच आई-वडिलांचा बळी घेतला व तुम्हा दोघांना लवकरच मृत्यूयोग आहे अशी भीती घातली.


