Nashik Vidhanparishad Election News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. अशातच अनेक ठिकाणी बंडखोरी देखील होण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, नाशिकमध्ये महाविकास आघाडीने उमेदवार दिलेला नाही. यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या निवडणुकीत घोडेबाजारला उत आलाय
या निवडणुकीत घोडेबाजारला उत आला आहे. त्यात आम्ही सहभागी होऊ इच्छित नसल्याची प्रतिक्रिया रवींद्र मिर्लेकर यांनी दिली. आमच्याकडे आर्थिक सक्षम उमेदवार नाही त्यामुळं आम्ही निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली होती. मात्र त्यांनीही नकार दिल्याचे मिर्लेकर म्हणाले. आम्ही अद्याप कोणालाही पाठिंबा दिला नाही, मतदारांना काय संदेश देणार याबाबतीत दोन ते तीन दिवसांत निर्णय होणार असल्याचे मिर्लेकर म्हणाले. कोणत्याही अपक्ष उमेदवाराला आमच्या नगरसेवकाने पाठींबा दिला असेल तर करवाई करणार असल्याची माहिती रवींद्र मिर्लेकर यांनी दिली.


