नाशिक : विधानपरिषद निवडणुकांच्या (Vidhanparishad) उमेदवारीसाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाही उमेदवारांची नावे पक्षाकडून अंतिम करण्यात आली नाहीत. विशेष म्हणजे, अद्यापही काही जागांवर महायुतीत मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे. जागावाटपात भाजपने (BJP) 12 जागांवर दावा केला असला तरी शिंदेंच्या शिवसेनेकडून काही जागांवर आग्रह कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीत तणाव स्पष्ट दिसत आहे. आधी रायगडमध्ये शिवसेना आमदारा महेंद्र दळवी यांच्या मुलीने अर्ज भरल्यानंतर आता नाशिकमध्येही (Nashik) नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

 

भाजपचे नाशिक शहर उपाध्यक्ष निलेश बोरा हेही येथील जागेसाठी आग्रही असून नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, नाशिक विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट आला असून भाजपकडून माजी नगरसेवक आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गणेश गीते यांनी आपण भाजपकडून उमेदवारी अर्ज भरत असल्याचा दावा केला आहे. गणेश गीते यांनी भाजपकडून उमेदवारी करत असल्याचा दावा केल्याने नाशिकच्या जागेबाबत संभ्रम वाढला आहे. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माझे नेते गिरीश महाजन यांनी या जागेसाठी शब्द दिला होता. येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत ही जागा लढवण्याचा शब्द दिल्यामुळेच मी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे गीते यांनी म्हटलंय. दुसरीकडे येथील जागेसाठी राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ हेही आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीत अद्यापही जागावाटप निश्चित झाल्याचं जाहीर करण्यात आलं नसून उमेदवारांची यादीही प्रतिक्षेत आहे.

 

सांगली-साताऱ्यात शिवसेना उमेदवाराचा अर्ज

सातारा-सांगली विधानपरिषद जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे. हा दावा करत सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून सांगली जिल्हा बँकेचे संचालक आणि आटपाडी  मधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी  आपल्या कार्यकर्त्यांसह  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या जागेबाबत आता भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे. तानाजी पाटील यांनी खानापूर आटपाडीचे शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या समवेत  एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, आता तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने सातारा-सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

 

रायगडमध्ये शिवसेना आमदारकन्येचा अर्ज

रायगड विधानपरिषदेसाठी आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आम्ही तटकरेंच्या विरोधात आहोत, त्यांनी कायम आमच्यावर अन्याय केला आहे. एकनाथ शिंदे काय बोलतात? याबाबत विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जुईली दळवी यांनी दिली. तर, दळवी यांच्या मुलीने नेमका कशासाठी फॉर्म भरला याबाबत महेंद्र दळवी यांच्याशी मी चर्चा करेन. तसेच, ते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील, असे मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, रायगडच्या विधानपरिषद जागेवरुन शिवसेना-महायुतीत आलबेल नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.

 

Vidhan Parishad Election 2026:  कोणत्या ठिकाणी होणार निवडणूक?

1) पुणे 2) अहिल्यानगर 3) ठाणे 4) जळगाव 5) सांगली-सातारा 6) नांदेड 7) यवतमाळ 8) सोलापूर 9) भंडारा-गोंदिया 10) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 11) नाशिक 12) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली 13) अमरावती 14) धाराशिव-लातूर-बीड 15) परभणी-हिंगोली 16) छत्रपती संभाजीनगर-जालना 17) नागपूर (पोटनिवडणूक)

 

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर
अधिसूचना जारी : 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून - स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून